दाभोसा ग्लास स्कायवॉकमुळे पर्यटनाला चालना; स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी-----पालकमंत्री गणेश नाईक

Date: 2026-08-19
news-banner


नवयुग पालघर
****दाभोसा ग्लास स्कायवॉकमुळे पर्यटनाला चालना; स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी-----पालकमंत्री गणेश नाईक

पालघर, दि. १५ ऑगस्ट २०२६ : दाभोसा धबधबा परिसरात उभारण्यात आलेल्या ग्लास स्कायवॉकचे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकार्पण करण्यात आले. वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, उपवनसंरक्षक सैफुन शेख, प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पी. व्ही. अमल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केनी, सरपंच योगिता माडी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

दाभोसा परिसरात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पार्किंग, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि परिसरातील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार असून दाभोसासह जव्हार तालुक्यातील इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठीही आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना दिल्या.

पर्यटनाचा आर्थिक लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायतीला पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा देणे, पार्किंग व्यवस्थेतून स्थानिक संस्थांना उत्पन्न मिळवून देणे आणि महिला बचतगटांना पर्यटन व्यवसायाशी जोडणे याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

या अंतर्गत स्थानिक आदिवासी कुटुंबांना पर्यटनाचा थेट लाभ मिळावा यासाठी ‘होम-स्टे’ची सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्थानिक कुटुंबांच्या घरांमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास निवास, भोजन आणि इतर स्थानिक सेवांमधून कुटुंबांना उत्पन्नाचे साधन मिळू शकते. त्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य व कर्जव्यवस्थेबाबत प्रशासनाने विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पर्यटकांची गर्दी वाढल्यास सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले असून स्कायवॉकची क्षमता, प्रवेशव्यवस्था, सीसीटीव्ही आणि गर्दी नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याबरोबरच सीसीटीव्ही यंत्रणा स्थानिक पोलिसांशी जोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पर्यटनस्थळांवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्थानिक पर्यटन व्यवसाय, रिसॉर्ट आणि आदिवासी भागातील उद्योजकांना आवश्यक परवानग्या, मार्गदर्शन तसेच बँक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Leave Your Comments