वाढीव वीज बिलांच्या तक्रारींना एसीबीच्या कारवाईने बळ; बिल ‘सेटल’ करण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना वायरमन जाळ्यात

Date: 2026-08-21
news-banner
नवयुग पालघर
***वाढीव वीज बिलांच्या तक्रारींना एसीबीच्या कारवाईने बळ; बिल ‘सेटल’ करण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना वायरमन जाळ्यात***

पालघर, दि. २१ : वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारी वीज ग्राहकांकडून सातत्याने केल्या जात असताना, अशाच एका ग्राहकाचे जास्तीचे वीज बिल ‘सेटल’ करून कमी करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना महावितरणचा वायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे वाढीव वीज बिलांबाबत ग्राहकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याच्या संशयाला एकप्रकारे बळ मिळाले असून, ग्राहकांच्या तक्रारींची अधिक गांभीर्याने चौकशी करण्याची गरजही या प्रकरणाने अधोरेखित केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर घटकाने 
२० ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत प्रदीप सुभाष महाजन याला रंगेहात पकडण्यात आले. महाजन हा महावितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत असून, तो तक्रारदाराच्या घरी जाऊन वीज मीटरची तपासणी केल्यानंतर जास्तीचे येणारे वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार  एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घराचे वीज बिल जास्त येत होते. या संदर्भात आरोपीने घरातील वीज मीटरची तपासणी केली. त्यानंतर जास्तीचे वीज बिल ‘सेटल’ करून देण्यासाठी आठ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीची १९ ऑगस्ट रोजी पालघर तालुक्यातील दांडापाडा, खारकुरण येथे कायदेशीर पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आरोपी प्रदीप महाजन याने जास्तीचे वीज बिल सेटल करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.
त्यानंतर २० ऑगस्ट रोजी मिठागर रोड, पालघर येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी प्रदीप सुभाष महाजन याला तक्रारदाराकडून पंचांसमक्ष आठ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

*ग्राहकांच्या तक्रारींना मिळाले नवे बळ*
वीज ग्राहकांकडून वाढीव बिलांबाबत वारंवार तक्रारी केल्या जातात. अनेकदा मीटर तपासणी, बिल दुरुस्ती, रीडिंग किंवा इतर तांत्रिक कारणांचा हवाला देत या तक्रारी हाताळल्या जातात. मात्र, या प्रकरणात जास्तीचे वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी थेट पैशांची मागणी झाल्याचे एसीबीच्या पडताळणीत पुढे आले आहे.

विशेष म्हणजे, ग्राहकाचे वाढीव बिल कमी करून देण्याच्या नावाखाली पैसे मागितल्याचा आरोपच या कारवाईचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे वाढीव वीज बिलांच्या तक्रारींची पारदर्शक, तांत्रिक आणि स्वतंत्र तपासणी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू शकते.

*कारवाईत सहभागी अधिकारी व पथक*
या सापळा कारवाईत  राकेश लक्ष्मण डांगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर, ठाणे परिक्षेत्र यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले.
या कारवाईचे पर्यवेक्षण दादाराम सुभाष करांडे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर, ठाणे परिक्षेत्र यांनी केले. सापळा पथकात पोहवा विलास भोये, जितेंद्र गवळे, प्रकाश दळवी आणि आकाश लोहारे यांचा समावेश होता.

Leave Your Comments