**इंग्रजी माध्यमाचा निर्णय : पुनर्विचाराची गरज**

Date: 2026-03-09
news-banner

         सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीने परवाच आपल्या नियोजित प्राथमिक/माध्यमिक शाळेच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन केले. ही शाळा इंग्रजी माध्यमाची असेल असेही यावेळी जाहीर झाले....असे का व्हावे ?  मराठी माध्यमाला सोडचिठ्ठी देणे कितपत योग्य आहे, याची चर्चा घडविणारे, 
नवयुग पालघरचे हे  संपादकीय

**इंग्रजी माध्यमाचा निर्णय : पुनर्विचाराची गरज**

    पालघर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीने १९७० साली महाविद्यालयीन शिक्षणाची मुहूर्तमेढ  रोवली. त्या पहिल्या टप्प्यानंतर संस्थेच्या वाटचालीत आता आणखी एक ऐतिहासिक पान जोडले गेले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतीचे भूमिपूजन हा त्या प्रवासातील एक महत्त्‌वाचा टप्पा ठरतो. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षणाची साखळी अधिक व्यापक करण्याची गरजही निर्माण झाली आहे. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांपासून पुढे विविध शाखांसह विधी महाविद्यालयाची भर घालत या संस्थेने विरारपासून  थेट गुजरातपर्यंत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जोड देण्याचा निर्णयही महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्हच म्हणावा लागेल.
        या महाविद्यालयाने गेल्या अनेक दशकांत  घडवलेल्या कार्याचा  सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत पुढे गेले आहेत/चमकत आहेत. यातील काही विद्यार्थी प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी अशा जबाबदारीच्या पदांवर पोहोचले, तर काहींनी संस्थेच्या नेतृत्वातही स्थान मिळवले. या सर्व प्रवासात त्यांनी ज्या भाषेत शिक्षण घेतले,ती भाषा त्यांच्या प्रगतीच्या आड आली नाही हे वास्तवही आपल्यासमोर आहे.
                    मात्र या नवीन टप्प्याला सुरुवात करताना प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या आनंदाला काहीशी खंताची किनार लाभली आहे. शिक्षणातील माध्यमाचे महत्त्व जगभर अधोरेखित झालेले आहे. मातृभाषा आणि स्थानिक बोलीभाषांमधून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, विचारक्षमता आणि सर्जनशीलता अधिक सक्षम होते, असा शैक्षणिक अभ्यासकांचा आग्रह फार पूर्वीपासून राहिला आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर देण्यात आलेला आहे.
              इंग्रजी ही एक जागतिक संवादाची भाषा आहे आणि ती उत्तम प्रकारे शिकलीच पाहिजे, याबाबत कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र केवळ इंग्रजी माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडते, असा समज वास्तवाशी फारसा सुसंगत नाही. यासंदर्भात अनेक उदाहरणे आपल्या समाजात दिसतात. प्रसिद्ध शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन जागतिक पातळीवर आपली छाप निर्माण केली आहे. प्रशासकीय सेवांमध्येही अशा अनेक व्यक्ती आढळतात. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातूनही मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे संस्थेने स्वत: सिद्ध केलेल्या या परंपरेचा विचार करता नव्या शाळांचे माध्यम इंग्रजी ठेवण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटतो. संत सोनोपंत दांडेकर (सोनूमामा) यांच्या नावाने उभ्या असलेल्या या संस्थेची वैचारिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेतली, तर मातृभाषेला न्याय देणारा दृष्टिकोन अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
           अलीकडील काळात पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला दिसतो, हेही वास्तव आहे. मात्र चांगल्या दर्जाचे मराठी माध्यमातील शिक्षण देणारी शाळा हा त्यावर सक्षम पर्याय ठरू शकतो. अनेक दशकांपासून विश्वासार्हता निर्माण केलेल्या सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीला दर्जेदार मराठी शिक्षण देणारी शाळा उभारणे आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करणे हे अशक्यप्राय काम निश्चितच नाही.
                  पालघर हा प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी भागांचा जिल्हा आहे. अशा पाश्र्वभूमीवर मातृभाषेतून शिक्षण  देणार्‍या संस्थांची गरज अधिक अधोरेखित होते. म्हणूनच या नव्या शैक्षणिक उपक्रमाचे स्वागत करतानाच शाळांच्या माध्यमाबाबत संस्थेने पुन्हा एकदा साधकबाधक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करणे गैर ठरणार नाही !

Leave Your Comments