नवयुग पालघर
**सायबर गुन्हे, अमली पदार्थ सेवन आणि रस्ते अपघातावर पोलिसांचे मार्गदर्शन**
सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे सेवन आणि रस्ते अपघातांसारख्या गंभीर समस्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालघर पोलिस दलाच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यशाळेत सध्याच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी/यूपीआय फसवणूक, बनावट सोशल मीडिया अकाउंट, डिजिटल अरेस्ट, केवायसी फसवणूक आणि सोशल मीडिया सुरक्षितता याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक विनायक नरले, परी. पोलीस उपअधीक्षक निशा सोनवणे, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि/अनिल व्हटकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोउपनि/समीर भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील नागरिक, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याबाबत नागरिकांना माहितीदेतानाच अमली पदार्थांच्या विरोधात समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
रस्ता सुरक्षा आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच वेगमर्यादेचे पालन करणे याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबरीने सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.