रामभाऊ वाडू : आदिवासी-कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारा कार्यकर्ता*

Date: 2026-09-01
news-banner
**रामभाऊ वाडू : आदिवासी-कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारा कार्यकर्ता**

भूमिसेनेमधील आरंभीच्या काळातील एक प्रमुख नेते १६ ऑगस्टला काळाच्या पडद्याआड गेले. 
जिद्दी, मेहनती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हाडाचा कार्यकर्ता ही रामभाऊ वाडू यांची खरी ओळख होती. भूमिसेनेची मजूर संघटना, जिल्हा ठाणे या ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष होते. हमाल, ट्रक हमाल, रेती कामगार, वीटभट्टी मजूर, शेतमजूर, रोजगार हमी योजनेवर काम करणारे कामगार, हॉटेल कामगार, वन कामगार, मिठागर कामगार अशा असंघटित मजुरांचे संघटन त्यांनी उभारले होते.

या कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक शिबिरे घेतली. अत्यंत निर्भीड असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांच्या स्वभावाचा आणखी एक ठळक गुण होता. सावकार, जमीनदार, मालक किंवा सरकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना कोणतीही भीती न बाळगता ते स्पष्टपणे कामगारांची बाजू मांडत.

कामगारांच्या हक्कांसाठी ठामपणे उभा राहणारा लढवय्या कार्यकर्ता हीच त्यांची ओळख अखेरपर्यंत कायम राहिली.
लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर त्यांची निष्ठा अढळ होती. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढाण ग्रामपंचायतीमध्ये झेंडावंदनाच्या वेळी त्यांनी केलेले भाषण हे त्यांचे अखेरचे भाषण ठरले.

शेतमजूर शेतकरी पंचायतच्या माध्यमातूनही त्यांनी काम केले. कागदपत्रे असलेली घडी केलेली हातातील पिशवी किंवा शबनम कायम त्यांच्या सोबतीला असायची. गावोगावी ते एकट्याने पायी हिंडायचे. तिथल्या प्रश्नांवर गावकऱ्यांशी बोलायचे. वैयक्तिक जमिनीचे किंवा अन्य प्रश्न घेऊन गावकरी विश्वासाने त्यांच्याकडे येत.

भूमिसेना नेते निसर्गवासी काळूराम काकांच्या सोबत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रवास केला. एकप्रकारे काकांच्या सावलीतच ते राहिले. सामाजिक कामाच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी गावोगावच्या माणसांशी नाते जोडले आणि त्यांच्या प्रश्नांना आपले प्रश्न मानून त्यासाठी आवाज उठवला. निवडणुकीच्या राजकारणात मात्र त्यांना यश आले नाही.

 त्यांच्या जाण्याने भूमिसेनेच्या आरंभीच्या पिढीतील एक नेतृत्व हरपले नाही, तर आपल्या हक्कांसाठी न घाबरता आवाज उठवणारा एक लढवय्या कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला.

Leave Your Comments