नवयुग पालघर
****शिवसेनेने ठाणे-पालघरचा ‘टायगर’ दुर्लक्षित केला?
निलेश सांबरे यांच्या भूमिकेवरून कार्यकर्त्यांत चर्चा****
**ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर सांबरे यांच्या ताकदीची पुन्हा चर्चा; पक्षातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह**
ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या राजकारणात ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष महत्त्व आहे. या बँकेवरील नियंत्रण हे दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारे मानले जाते. त्यामुळे यंदाची बँक निवडणूक शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि इतर प्रमुख नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली.
या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलची घोषणा करत मैदानात उतरण्याची भूमिका घेतली होती. या पॅनलमध्ये बाबाजी पाटील यांची सक्रियता आणि त्यामागे मंत्री गणेश नाईक यांची अप्रत्यक्ष भूमिका असल्याची चर्चा होती. दुसरीकडे सहकार पॅनलमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर सक्रिय होते.
महायुतीतील मतभेदांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलली. या निवडणुकीत खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक,आमदार किसन कथोरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सक्रिय भूमिका दिसून आली.
मात्र या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे . ठाणे-पालघर परिसरात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या मोफत सीबीएसई शाळा, रुग्णालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामुळे त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सामाजिक कामातून त्यांनी तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणजे, पक्षात उपनेतेपदावर असूनही या निवडणुकीत त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. परिणामी त्यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरावे लागले. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे.
अपक्ष म्हणून लढताना सांबरे यांनी दोन्ही प्रमुख पॅनलसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यांनी बँकेतील कारभार, कथित भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि भविष्यातील धोरणे यावर ठोस भूमिका मांडली. त्याचा परिणाम म्हणून इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघात त्यांनी प्रस्थापित उमेदवाराला शंभर मतांच्या फरकावर रोखले, तर विक्रमगड तालुका सेवा संस्था मतदारसंघातून विजय मिळवला.
याआधी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही अपक्ष लढताना सांबरे यांनी तब्बल ०२ लाख ३१ हजारांहून अधिक मते मिळवून आपली ताकद दाखवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांनी नमूद केले होते.
दरम्यान, शिवसेनेने अलीकडच्या काळात इतर पक्षांतील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश देत त्यांना संधी दिली. मात्र ठाणे-पालघरसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यात स्वतःच्या उपनेत्यालाच योग्य संधी न मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर निलेश सांबरे यांच्या राजकीय वजनाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि २०२९ च्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की, बाहेरचे ‘टायगर’ पक्षात आणताना शिवसेना आपला ठाणे-पालघरचा ‘टायगर’ गमावत आहे का ?